शनिवार, ६ फेब्रुवारी, २०१६

जातीभेद, स्वावलंबन

चंपारण्य सत्याग्रह ः 3
चंपारण्य सत्याग्रहाच्या आठवणी लिहीताना राजेंद्रप्रसादांनी दोन गोष्टी लिहिल्या आहेत. राजेंद्र प्रसाद यांच्या घरी ज्यावेळी राजकुमार शुक्‍लांना घेऊन महात्माजी गेले तेव्हा त्यांना तिथे अत्यंत तुच्छतेची वागणूक मिळाली. जातीपाती त्याकाळात पाळल्या जात. गांधीजींना राजेंद्रबाबूंच्या नोकराने सांगितले की तुम्ही इकडे बाहेर बसा आणि हे बाहेरचे स्वच्छतागृह वापरा. ते स्वच्छतागृह शुद्रांसाठी होते. त्यावेळी राजेंद्रबाबूंची भेट झाली नव्हती. चंपारण्य सत्याग्रहात देशभरातील मान्यवर सहभागी झाले होते. लोकांच्या तक्रारी एकून घेणे. त्यानंतर त्या सरकारला पोहचविणे असे त्याचे स्वरुप होते. हजारो लोकांच्या तक्रारी दाखल झाल्या. सरकारने एक समिती नेमली. त्यात सरकारचे दोन प्रतिनीधी, इंग्रजांचे दोन प्रतिनीधी, शेतकऱ्यांचे प्रतिनीधी म्हणून महात्माजी होते. सरकारने या सत्याग्रहानंतर तीन कठियाचा कायदा रद्द केला.
या सत्यग्रहाच्या आठवणी लिहिताना राजेंद्रबाबू जे की भारताचे पहिले राष्ट्रपती झाले, त्यांनी दोन आठवणी लिहिल्या आहेत. सत्याग्रहासाठी जमलेले मान्यवर वेगवेगळ्या चुलीवर स्वयंपाक करुन खात होते. गांधीजींनी सगळ्यांना एकाच चुलीवरचा स्वयंपाक करायला आणि खायला सांगितला. जातीभेद दुर झाले पाहिजे, यासाठीची ही कृती होती. पहिल्यांदाच घराबाहेर आणि उच्चवर्णीय आचाऱ्याशिवाय कोणतीही गोष्ट न पाहता मी जेवण केल्याचे राजेंद्रबाबूंनी म्हटले आहे. दुसरी गोष्ट एक दिवस रात्री गांधीजींच्या खोलीतून आवाज येत असल्याचे त्यांना ऐकू आले. ते गेले तर गांधीजीं स्वतःचे कपडे स्वतः धूत असल्याचे त्यांना दिसले. मी त्यातून स्वावलंबनाचा धडा घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चंपारण्याताल हा सत्याग्रह यशस्वी झाला. तीन कठियाचा कायदा रद्द झाला. गांधीजी देशातील शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनले. या काळातील सतत त्यांच्याबरोबर असलेल्या महादेवभाईंनी लिहिलेली आठवणही गांधीजींच्या निर्भयतेची साक्ष देणारी आहे. गांधीजी सतत माणसात असत. या काळात एक निळीचा व्यापारी असे म्हणाला की एकटा सापडू दे गांधीला खलासच करतो. हे महात्माजींच्या कानावर आले. ते एक दिवस पहाटे लवकर उठून त्या व्यापाऱ्याच्या दारात गेले. त्याला म्हणाले, मी तरी काय करु. सतत लोक माझ्याबरोबर असतात. आता मी एकटाच आहे. तर तु तुझे काम करुन घे. मला खलास कर. तुझी प्रतिज्ञा पूर्ण कर.' तो व्यापारी खजील झाला.
1917 सालातील ही घटना. त्यानंतर आयुष्याच्या अखेपर्यंत गांधीजींचा व्यवहार असाच निर्भय होता.
महात्माजींनी म्हटले आहे, "अपकाराचा मोबदला अपकार नसून उपकार आहे. जो पाणी देईल त्याला चांगले जेवण घालावे. जो आपल्याशी डोके नमवेल, त्याला सांष्टांग दडंवत घालावा. एका पैशाची झीज सोसेल त्याचे मोहरांनी ऋण फेडावे. प्राण वाचविल त्याच्या दुःख निवारणाच्या कामी प्राण वेचावे. एका उपाराबद्दल दहा उपकार करावेत. परंतु जगात सर्वक्षेष्ठ तोच जो काया वाचा मनेकरुन अपकाराच्या बाबतीत उपकारच करतो.' 

शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१६

गुन्हा कबूल, शिक्षा द्या

चंपारण्यातला सत्याग्रह 2
एकाद्या विषयावर भूमिका घेताना महात्मा गांधी नेहमी त्या विषयाची सांगोपांग माहिती घेत असत. चंपारण्यात सत्याग्रहासाठी जायचे म्हटल्यावर निळीच्या कायद्याची माहिती असणारा वकिल आहे का म्हणून महात्मा गांधी यांनी राजकुमार शुक्‍लांना विचारले. त्यांनी राजेंद्र प्रसाद यांचे नाव सांगितले. राजकुमार आणि महात्माजी दोघे मिळून पाटण्याला आले. तिथे त्यांना राजेंद्रप्रसाद यांना भेटायचे होते. पण तिथे त्यांची राजेंद्रबाबूंशी भेट झाली नाही. मग गांधीजींना त्याच्याबरोर लंडनला बॅरिस्टरीचे शिक्षणासाठी असलेल्या मंजरुल हक यांची आठवण झाली. त्यांना गांधीजींनी चिठ्ठी पाठविली. ते घोडागाडी घेऊन गांधीजींनी नेण्यासाठी आले. त्यांना गांधीजींनी नीळ उत्पादकांवरील अन्यायाबाबत विचारले. चांगले वकिल कुठे मिळतील, याची माहिती घेतली. त्यांनी मुजफ्फुरनगरला जावे लागले असे सुचविले. त्यावेळी गांधीजींनी प्रा. जीवतराम कृपलानी यांची आठवण झाली. त्यांना गांधीजींनी चिठ्ठी पाठविली. ते रात्री विद्यार्थ्यांसह गांधीजींना नेण्यासाठी स्टेशनवर आले. त्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांना रेस्ट हाऊसमध्ये गांधीजींची सोय करावी म्हणून विनंती
केली पण ती त्या गोऱ्या अधिकाऱ्याने ते काही मान्य केले नाही. मग त्यांच्या एका मित्राकडे गांधीजींची राहण्याची सोय झाली.
तिथे काही वकिलांबरोबर गांधीजींची चर्चा झाली. आंदोलन करायचे म्हटल्यावर गांधीजींचा एक नियम होता, ज्यांच्याविरोधात आंदोलन करायचे, त्यांना भेटायचे त्यांचे मत ऐकून घ्यायचे असा गांधीजींचा दंडक होता. नीळ व्यापाऱ्यांच्या संघटनेच्या सचिवाला गांधीजी भेटले. त्यांनी सांगितले. तुम्ही या फंदात फडू नका. पोलिक कमिशन आणि कलेक्‍टरांनीही गांधीजींना स्थानिक नागरिक आपल्या समस्या सोडवतील, तुम्ही लक्ष घालू नका, असे सांगितले. पण मागे हटतील ते गांधीजी कसले?
आपल्या अनेक सहकाऱ्यांबरोबर गांधीजी हत्तीवर बसून चंपाऱ्यातील शेतकऱ्यांकडे निघाले असताना वाटेतच त्यांना सरकारी माणसाने पोलिस कमिशनरांनी बोलावल्याचे सांगितले. आपल्या सहकाऱ्यांना पुढे पाठवून गांधीजी पोलिस कमिशनरांना भेटायला गेले. त्यांनी सांगितले, तुम्ही तिकडे जाऊ नका. चंपारण्यात तुमच्यासाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गांधीजी म्हणाले, "या देशातील कुणा शेतकऱ्यावर जर अन्याय होत असेल तर मला त्यांना भेटायला त्यांच्या तक्रारी ऐकून घ्यायला गेलेच पाहिजे.'
दुसऱ्या दिवशी गांधीजींना न्यायालयात उभा करण्यात आले. शेतकरी आणि त्यांच्या साथीदारांच्या न्यायालयत भरुन गेले होते. तिथे प्रवेशबंदीचा सरकारी आदेश पाळला नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी न्यायालयाला गांधीजी म्हणाले, मी कायदा पाळणारा माणूस आहे, पण इथला प्रवेशबंदीचा आदेश मी पाळणार नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेणे मी माझे कर्तव्य समजतो. तुम्हा जी शिक्षा द्यायची ती मला द्या.
गुन्हा कबूल करणारा आणि लगेच शिक्षा मागणारा अजब माणूस न्यायालयाने कदाचित पहिल्यांदाच बधितला असावा. यांनी इतकी लगेच शिक्षा मागितली तरी न्यायालयाने सुनावणी दुसऱ्या दिवसावर ढकलली. गांधीजींनी दरम्यान रात्री गव्हर्नरला तार करुन कळविले. व्हाईसरॉयलाही याबाबत कळवावे, असे सांगितले. त्याचा चांगला परिमाण झाला. गांधीजींवरचा खटला मागे घेण्यात आला. तिथून बाहेर पडल्यावर गांधीजींनी पहिली गोष्ट अशी केली की वर्तमानपत्राच्या संपादकांना पत्र पाठवून प्रसिद्धीयोग्य बातम्या मी स्वतः तुमच्याकडे पाठविन. तुम्ही बातमीदारांना इकडे पाठविण्याचा त्रास घेऊ नका, असे कळविले. दुसरी गोष्ट म्हणजे या आंदोलनापासून स्थानिक राजकीय नेत्यांनी दूर ठेवले. 

गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१६

चंपारण्य सत्याग्रह 1

महात्मा गांधीजींना देशातील शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनविले ते चंपारण्यात नीळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलेल्या सत्याग्रहाने. त्याची सुरवात 1916 मध्ये झाली. कॉंग्रेसचे लखनौला अधिवेशन होते. तिथे सगळ्या नेत्यांना भेटायचा प्रयत्न एक शेतकरी करीत होता, पण त्याचे म्हणणे कुणी ऐकून घेत नव्हते. राजकुमार शुक्‍ला असे त्यांचे नाव. चंपारण्यातील नीळ उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायबाबत कॉंग्रेसने ठराव करावा, अशी त्यांची मागणी होती. त्यावेळी त्यांची साध्या काठेवाडी पोशाखातील गांधीजींशी भेट झाली. त्याने गांधीजींना निवेदन दिले. कॉंग्रेस अधिवेशनात ठराव करावा, अशी त्यांची मागणी होती. गांधीजींनी त्यांना सांगितले मी प्रत्यक्ष परिस्थीती पाहिल्याशिवाय ठराव करता येणार नाही. मी तिकडे आलो की मला भेट. गांधीजी तीन चार महिन्यांनी कलकत्त्याला बैठकीसाठी गेले. तिथे पुन्हा राजकुमार शुक्‍ला यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले नीळ उत्पादक शेतकऱ्यांना बळजबरीने इंग्रज व्यापारी नीळ पिकविण्यास भाग पाडतात. अत्यंत कमी किंमतीत ते नीळ खरेदी करतात. जगातील 80 टक्के नीळ त्यावेळी चंपारण्यात पिकविली जात होती. तिथे तीन कठियाचा कायदा होता. वीस कठांचा एकर. त्यातले तीन कठ नीळ लावणे शेतकऱ्यांसाठी बंधनकारक होते. शेतकऱ्यांनी हे ऐकले नाही. तर इंग्रज व्यापारी त्यांनी चापकाचे फटकारे मारत. अशी ही सगळी व्यथा ऐकल्यावर तातडीने सगळे हातातले कार्यक्रम त्यांनी बाजूला सारले आणि या आंदोलनासाठी तिथून निघाले.
आजही शेतीत आणिबाणीची स्थीती आहे. कारण सध्या रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या आपण वाचतो. एकीकडे भयाण दुष्काळ, दुसरीकडे पिकणाऱ्या शेतमालाला पुरेसा भाव नाही. शेतीकडे सरकारचे दुर्लक्ष, रोजगाराचा अभाव अशा चक्रात शेती उद्योग अडकला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शेतमालाचे उत्पादन वाढत असताना, अन्नसुरक्षेच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होत असताना शेतीचा जीडीपीतला टक्का मात्र सातत्याने घसतो आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा शेतीचा राष्ट्रीय सकल उत्पन्नातला हिस्सा 60 टक्‍क्‍याच्या आसपास होता. त्यावेळी शेतीवर अवलंबून असणारे लोकसंख्या सुमारे 75-80 टक्के इतकी होती. आता ही शेतीवरची लोकसंख्या 60-65 टक्‍क्‍यांकडे कडे आली असली तरी शेतीचा सकल उत्पन्नातला हिस्सा अगदी 16 टक्के इतका आला आहे. याचा अर्थ अशा की शेतमालाला सरकार नीट भाव देत नाही. शेतकऱ्यांच्या हातात पुरेसा पैसा उत्पन्नातून यायला हवा तो येत नाही. त्यामुळे तो गळफास जवळ करत आहे.
अशा स्थितीत शेतकऱ्यांचे होणारे शोषण दूर करण्यासाठी गांधीविचारांच्या आंदोलनाची आज गरज आहे. 

बुधवार, ३ फेब्रुवारी, २०१६

यंत्र आणि माणूस


भारतासारख्या विकसनशील देशात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. मोठे उद्योग आणि साखळी उद्योगाच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था वाढत असल्याचा दावा केला जात असला तरी त्यातून गरीबी आणि श्रीमंत यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरात राहणारा माणूस आणि खेड्यातला माणूस यांच्या जीवनमानात मोठे अंतर आहे. नवीन उद्योगांनी शहरातील झोपड्या आणि खेड्यापाड्यात दुःख वाढविले आहे. काळ्या पैशाच्या जोरावर शहरातील धनिकांकडे मोठ्या प्रमाणात सुखसुविधा निर्माण झाल्या आहेत. त्या मानाने खेडी ओस पडल्याने आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळत नसल्याने ते आत्महत्या करु लागले आहेत.
गांधीजींनी सांगितले होते की गृहउद्योग, लघुउद्योग, मध्यमउद्योग आणि मोठे उद्योग उभे करताना यातल्या प्रत्येकाने आपापले उत्पादन ठरवून घ्यावे. एका उद्योगाने दुसऱ्याचे उत्पादन करु नये. त्यातून त्या त्या क्षेत्रात रोजगा उपलब्ध होईल. रोजगारासाठीचे स्थलांतर होणार नाही. शहरात संपत्ती आणि संसाधनाचे केंद्रीकरण होणार नाही. आताही ग्राणीम भागात कृषीपूरक उद्योग ही गरज आहे. त्यातून लोकांचे सर्वसामान्याचे जीवनमान सुधारेल. पण भारतीय अर्थव्यवस्थेत "क्‍लास' महत्वाचा मानते मास नाही.
गांधीजींनी हिंद स्वराज पुस्तकात भौतिकवादाविरूद्ध अभियोग लावला. गरजा वाढवा, त्यातून लोकांना काम मिळेल, प्रगती होईल, असे आजचे समाजाचे मानस आहे. अर्थशास्त्रही असेच सांगते. पण वाढलेल्या गरजा पृथ्वीला वांझ बनवू शकतात. त्यांना एकदा विचारले गेले की तुम्ही औद्योगिकरणाच्या विरोधात आहात काय, गांधीजी म्हणाले, "माणसाचे शरीर हे सुद्धा यंत्र आहे. माझा विरोध यंत्राला नाही. यंत्र माणसाचे गुलाम झाले पाहिजे. माणसाने यंत्राचा गुलाम होऊ नये.'
गांधीजींनी औद्योगिकरणाला विरोध नाही पण बेरोजगारी निर्माण करणाऱ्या आणि नैसर्गिक संसाधनाचा बेमाफ ओबरडणाऱ्या उद्योगांना मात्र विरोध केला. कृषी पूरक, गृह उद्योग, दुग्धोत्पादन, पशुपालन, खादी अशा उद्योगांचा पुरस्कार केला. अर्थव्यवस्थेचे आणि सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्याशिवाय खेड्यातील आणि शहरातील झोपडपट्यात राहणाऱ्या लोकांना न्याय मिळणार नाही.
----------------

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१६

स्वराज्य


बहुतेक प्रमुख पक्ष गांधीविचारांनी आपण चालत असल्याचे सांगतात तरीही "स्व'कडे बघायला आणि त्यातल्या अपप्रवृत्ती दूर करायला कुणाला वेळ नाही. त्यामुळे ते सामान्य माणसापासून तुटलेत. गांधीजींनी मांडलेला स्वराज्य या शब्दाचा अर्थ आपण पुन्हा एकदा लक्षात घेण्याची गरज आहे.
राजाराम ल. कानतोडे

स्वतःचे नाव व्हावे, त्यातून संपत्ती कमवता यावी यासाठी सत्ता हस्तगत करणे आणि सतत हातात रहावी, यासाठी झटणारे नेते आपण रोजच आजूबाजूला बघतो. गांधीजी यापेक्षा वेगळे होते. राजकारणाचे अध्यात्मीकरण झाले पाहिजे, हा विचार मांडणारे नामदार गोपाळकृष्ण गोखले हे त्यांचे राजकीय गुरू होते. त्यामुळे गांधीजी सांगतात की पदे इतरांची पिळवणूक करण्यासाठी किंवा सत्ता गाजविण्यासाठी नसतात. सत्ता हे सेवा आणि समाज बदलाचे साधन आहे. सत्तेचा हावरेपणा, आधुनिकीकरणातून येणारा भपकेबाजपणा, वस्तुंची गुलामी या बाबीचा आढावा गांधींजीनी टीकात्म पद्धतीने घेतलेला आढळतो. हिंसेची गुलामगिरी, वस्तुंचा हव्यास आणि उपभोगा यातून माणसाची सुटका व्हावी, हा गांधीजींचा ध्यास होता.
हिंद स्वराज हा ग्रंथ गांधीजींनी 1909 मध्ये लिहिली. त्यात त्यांनी इंग्रजांच्या वसाहतवादाविरूद्ध लिहिले आहे. हा वसाहतवाद मानवजातीस हानिकारक आहे. त्याचे कारण वसाहतवादी क्रूर बनून ज्यांच्यावर राज्य करतात, त्यांना हीनदीन बनवितात. कुणीतरी कुणावरती राज्य करणे या दोन्ही गोष्टी मानवजातीस हानीकारक आहे, असे त्यांनी सांगितले. ज्यावेळी ब्रिटीश साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता, तेव्हाची ही गोष्ट आहे.स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे लोकमान्य टिळकांनी म्हटलेले आपल्याला माहिती आहे. पण गांधीजींनी स्वराज्याचा मांडलेला अर्थ तितकासा परिचीत नाही. "स्व'च राज्य म्हणजे स्वराज्य नव्हे तर "स्व'वर राज्य म्हणजे स्वराज्य. माझं माझ्यावर राज्य ही गांधीजींची स्वराज्याची संकल्पना होती. ही संकल्पना जोपर्यंत रुजत नाही तोपर्यत स्वराज्य डळमळीत राहील. केवळ इंग्रजांना या देशातून घालवून खरे स्वराज्य मिळणार नाही. आपल्या आत्म्याला आपण वाचविले पाहिजे, असे अनेक विचार गांधीजींनी हिंद स्वराजमध्ये मांडले आहेत. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांना हे पुस्तक आवडले नव्हते. त्यांनी गांधीजींना पुस्तक रद्द करावे, असे सुचविले पण गांधीजींनी भाषेत सुधारता करता येईल. मुलभूत विचार बदलता येणार नाहीत, असे सांगितले होते. या पुस्तकाविषयी गांधीजींनी म्हटले आहे, की हे पुस्तक द्वेशधर्माऐवजी प्रेमधर्म शिकविते. हिंसेच्या जागी आत्मबलिदानाची स्थापना करते. पशुबळीच्याविरूद्ध टक्कर देण्यासाठी आत्मबळ उभ करते. टॉलस्टॉयने या पुस्तकाविषयी म्हटले की जगासाठी जर काही
उपयोगी विचार असतील तर ते हिंद स्वराज पुस्तकात आहे. विनोबा भावे यांनी या पुस्तकाची तुलना उपनिषधाशी केली आहे. सत्तेच्या केंद्रीकरणातून निर्माण होणाऱ्या सैनाती वृत्तीविरुद्ध लढण्याचा मार्ग दाखविताना गांधीजींनी राजकीय आणि आर्थिक विकेंद्रीकरणाचा मार्ग सांगितला आहे.
आजचा जमाना अंधानुकरण आणि सत्तेच्या केंद्रीकरणाचा आहे. बहुतेक प्रमुख पक्ष गांधीविचारांनी आपण चालत असल्याचे सांगतात तरीही "स्व'कडे बघायला आणि त्यातल्या अपप्रवृत्ती दूर करायला कुणाला वेळ नाही. त्यामुळे ते सामान्य माणसापासून तुटलेत. गांधीजींनी मांडलेला स्वराज्य या शब्दाचा अर्थ आपण पुन्हा एकदा लक्षात घेण्याची गरज आहे. 

सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

गरज आणि हाव

भाग २गरज आणि हाव वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीने जगावर कब्जा केला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने आणि ज्ञानाच्या स्फोटाने जग एक जागतिक खेडे बनत चालले आहे. अशा कालखंडातच नुकत्याच दक्षिण कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉंबच्या चाचणीने जग थरारले. पाकिस्तानातील विद्यापीठात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निरापधार विद्यार्थ्यांचे बळी गेले. भारताच्या पठाणकोट या हवाईतळावरील हल्ल्याने व्यवस्थेपुढे उभा राहिलेले अक्राळविक्राळ आव्हान समोर आले. पिळवणूक आणि प्रतिकूलता, दहशतवाद आणि मानवी दुःख, धार्मिक उन्माद आणि जातीय दंगली, बळी तो काळ पिळी आणि भ्रष्टाचार यांनी उच्छाद मांडला आहे. या वातावरणात नव्या पद्धतीच्या गुलामगिरीने आपल्याला विळखा घातला आहोत. नव्या तंत्रज्ञाने आपण चंद्रावरील माणसांशी बोलू लागलो आहोत पण आपल्या घरातला संवाद हरवत चालला आहे. सख्खे शेजारी एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागू लागलेले दिसतात. अशा प्रसंगी सत्य, अहिंसा तत्वांचे स्मरण करणे, जगाला नवी वाट दाखविणाऱ्या प्रेरणादायी महात्मा गांधीच्या चरित्राचे, विचारांचे मंथन हे नक्की नवीन उर्जा देणारे ठरेल. आपली माती, आपली माणसं, आपला विचार, आपले जगणं यांना कवेत घेणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांच्या सत्याच्या प्रयोगांचे स्मरण करणे ही आजची गरज आहे. त्याचे कारण महात्माजींनी प्रत्येक विचाराला आचरणाची जोड दिली. विचार आणि व्यवहार यात अंतर नसायला हवे, हे दाखविले. त्यामुळेच अल्बर्ट आईनस्टाईन नावाचा शास्त्रज्ञ म्हणाला होती की, "भावी पिढ्यांचा यावर विश्‍वास बसणे कठीण होईल की हाडामांसाचा असा एक माणूस या पृथ्वीतलावर होऊन गेला.' या महात्म्याला समजून घेत असताना त्यांनी मांडलेला एक विचार आपण सगळ्यांनी आजच्या चंगळवादाच्या जगात लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तो विचार असा की, "पृथ्वी प्रत्येकाच्या गरजा भागविण्याइतकी समर्थ आहे, पण ती प्रत्येकाची हाव भागवू शकत नाही.' गरज आणि हाव यातले अंतर माणसाला लक्षात यायला हवे. ते जर लक्षात आले नाही तर कितीही धावपळ केली तरी जगणे शांतीचे, सौख्याचे, समाधानाचे होत नाही. मला आणखी हवे, याला अंत नाही. माणसाचा हव्यास निसर्गाला ओरबडतोय आणि त्यातून उभा राहिलेली संकट आपण पहात अनुभवत आहोत. एक नदी नीट राहिलेली नाही. मी माझ्यापुरते बघणार या वृत्तीतून स्वच्छतेच्या अभावाचा किळवाणेपण सगळीकडे दिसते. स्वतःचा विनाश स्वतः करुन घेण्यासाठी सरसावलेल्या आजच्या जगात सत्यावर आधारित जगणे, अहिंसा आणि एकात्मता या मुल्यांची कधी नव्हे इतकी गरज निर्माण झाली आहे.
राजाराम ल. कानतोडे

शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

मोहनदास ते महात्मा


मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर इथं 1869 मध्ये झाला. वयाच्या केवळ तेराव्या वर्षी कस्तुबाबरोबर विवाह झाला. पुढे सहा वर्षांनी इंग्लडमध्ये वकिली शिक्षणासाठी प्रयाण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई आणि राजकोटमध्ये वकिली सुरू केली. पुन्हा एका खटल्यासाठी दक्षिण अफ्रिकेत गेले. तिथे साधारण 20-21 वर्ष राहिले. हिंदी बांधवांच्या सेवेसाठी झटले. तिथून परत आल्यावर चंपारण्यात सत्याग्रह केला. पुढे 1920 पासून शेवटपर्यंत भारतीय स्वातंत्रलढ्याचे नेतृत्व केले. त्यांच्यावर गोपाळकृष्ण गोखले यांचा प्रभाव होता. त्यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा होते. चार मुले होती. त्यांची नावे हरीलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास अशी होती. नोबेल पारितोषिकाने सन्मानीत झालेले कवी रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना महात्मा ही उपाधी दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले. दिल्लीत बिर्ला भवनच्या बागेत फिरताना 30 जानेवारी 1948 ला गोळी मारुन त्यांची हत्या करण्यात आली. नथुराम गोडसे नावाच्या जहालमतवादी हिंदू महासभेशी संबंधित असणाऱ्या माथेफिरूने हे कृत्य केला. केवळ देश नव्हे सगळे जग त्यावेळी हळहळले.
या घटना नमूद करण्याचे कारण असे की मोहनदास ते महात्मा हा प्रवास सहजगत्या झालेला नाही. मोहनदासमध्ये अनेक विरोधाआभास असल्याचे काहींना वाटते. पण यातूनही सत्याचा शोध घेणारा एक राजकीय नेता ते संत, एक लाजाळू मुलगा ते देशातील लाखो लोकांचा निर्विवाद नेता, आतला आवाज ऐकत माणसांना पशुत्वापासून दूर नेत सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह यांच्या जोरावर जगातील सर्वांत मोठी अहिंसक क्रांती घडवून आणणारा महात्मा. समाजात बदल घडवायचा असेल तर तो आधी स्वतःपासून सुरू केला पाहिजे, असे हे मांडणारा समाजसुधारक. त्यांचे सगळे आयुष्य ही त्यांच्यात झालेल्या बदलाची एक कहाणी आहे. राग, हिंसा, भ्रष्टाचार आणि माणसांच्या झालेल्या वस्तुकरणावर प्रेम, सत्य, अहिंसेच्या मार्गाने मात करता येते, हे त्यांचे जगणं बघितल्यावर आपल्या लक्षात येते. आतला हा आवाज बंदुकीची गोळी किंवा बॉंबपेक्षाही समाजाला बदलविण्यासाठी महत्वाचा जोरकस ठरतो. त्यातून माणसांबरोबर समाज बदलतो. त्याने ही पृथ्वी माणसांना राहण्योग्य होते, असे त्यांचे जीवनचरित्र सांगते.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारा नेते, राजकारणातील संत, जातीभेद दूर झाले पाहिजे, यासाठी झटणारे समाजसुधारक, शिक्षणासंबंधी मूलभूत विचार मांडणारा शिक्षणतज्ज्ञ, साधसुचितेचा आग्रह धरणारे कर्मवीर, पत्रकार, लेखक अशी कितीतरी महात्माजींची रुपे आहेत. शेवटच्या माणसाचे जगणं सुकर झाले पाहिजे, हा त्यांच्या सगळ्या खटाटोपीचा मध्यवर्ती केंद्रबिंदू होता म्हणून ते म्हणत सर्वांच्या कल्याणासाठी असणाऱ्या कोणत्याही शोधाला मी बक्षिस देईन, असे सांगत.
(क्रमशः)