शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

मोहनदास ते महात्मा


मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर इथं 1869 मध्ये झाला. वयाच्या केवळ तेराव्या वर्षी कस्तुबाबरोबर विवाह झाला. पुढे सहा वर्षांनी इंग्लडमध्ये वकिली शिक्षणासाठी प्रयाण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई आणि राजकोटमध्ये वकिली सुरू केली. पुन्हा एका खटल्यासाठी दक्षिण अफ्रिकेत गेले. तिथे साधारण 20-21 वर्ष राहिले. हिंदी बांधवांच्या सेवेसाठी झटले. तिथून परत आल्यावर चंपारण्यात सत्याग्रह केला. पुढे 1920 पासून शेवटपर्यंत भारतीय स्वातंत्रलढ्याचे नेतृत्व केले. त्यांच्यावर गोपाळकृष्ण गोखले यांचा प्रभाव होता. त्यांच्या पत्नीचे नाव कस्तुरबा होते. चार मुले होती. त्यांची नावे हरीलाल, मणिलाल, रामदास आणि देवदास अशी होती. नोबेल पारितोषिकाने सन्मानीत झालेले कवी रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना महात्मा ही उपाधी दिली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले. दिल्लीत बिर्ला भवनच्या बागेत फिरताना 30 जानेवारी 1948 ला गोळी मारुन त्यांची हत्या करण्यात आली. नथुराम गोडसे नावाच्या जहालमतवादी हिंदू महासभेशी संबंधित असणाऱ्या माथेफिरूने हे कृत्य केला. केवळ देश नव्हे सगळे जग त्यावेळी हळहळले.
या घटना नमूद करण्याचे कारण असे की मोहनदास ते महात्मा हा प्रवास सहजगत्या झालेला नाही. मोहनदासमध्ये अनेक विरोधाआभास असल्याचे काहींना वाटते. पण यातूनही सत्याचा शोध घेणारा एक राजकीय नेता ते संत, एक लाजाळू मुलगा ते देशातील लाखो लोकांचा निर्विवाद नेता, आतला आवाज ऐकत माणसांना पशुत्वापासून दूर नेत सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह यांच्या जोरावर जगातील सर्वांत मोठी अहिंसक क्रांती घडवून आणणारा महात्मा. समाजात बदल घडवायचा असेल तर तो आधी स्वतःपासून सुरू केला पाहिजे, असे हे मांडणारा समाजसुधारक. त्यांचे सगळे आयुष्य ही त्यांच्यात झालेल्या बदलाची एक कहाणी आहे. राग, हिंसा, भ्रष्टाचार आणि माणसांच्या झालेल्या वस्तुकरणावर प्रेम, सत्य, अहिंसेच्या मार्गाने मात करता येते, हे त्यांचे जगणं बघितल्यावर आपल्या लक्षात येते. आतला हा आवाज बंदुकीची गोळी किंवा बॉंबपेक्षाही समाजाला बदलविण्यासाठी महत्वाचा जोरकस ठरतो. त्यातून माणसांबरोबर समाज बदलतो. त्याने ही पृथ्वी माणसांना राहण्योग्य होते, असे त्यांचे जीवनचरित्र सांगते.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारा नेते, राजकारणातील संत, जातीभेद दूर झाले पाहिजे, यासाठी झटणारे समाजसुधारक, शिक्षणासंबंधी मूलभूत विचार मांडणारा शिक्षणतज्ज्ञ, साधसुचितेचा आग्रह धरणारे कर्मवीर, पत्रकार, लेखक अशी कितीतरी महात्माजींची रुपे आहेत. शेवटच्या माणसाचे जगणं सुकर झाले पाहिजे, हा त्यांच्या सगळ्या खटाटोपीचा मध्यवर्ती केंद्रबिंदू होता म्हणून ते म्हणत सर्वांच्या कल्याणासाठी असणाऱ्या कोणत्याही शोधाला मी बक्षिस देईन, असे सांगत.
(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा