सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

गरज आणि हाव

भाग २गरज आणि हाव वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीने जगावर कब्जा केला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने आणि ज्ञानाच्या स्फोटाने जग एक जागतिक खेडे बनत चालले आहे. अशा कालखंडातच नुकत्याच दक्षिण कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉंबच्या चाचणीने जग थरारले. पाकिस्तानातील विद्यापीठात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निरापधार विद्यार्थ्यांचे बळी गेले. भारताच्या पठाणकोट या हवाईतळावरील हल्ल्याने व्यवस्थेपुढे उभा राहिलेले अक्राळविक्राळ आव्हान समोर आले. पिळवणूक आणि प्रतिकूलता, दहशतवाद आणि मानवी दुःख, धार्मिक उन्माद आणि जातीय दंगली, बळी तो काळ पिळी आणि भ्रष्टाचार यांनी उच्छाद मांडला आहे. या वातावरणात नव्या पद्धतीच्या गुलामगिरीने आपल्याला विळखा घातला आहोत. नव्या तंत्रज्ञाने आपण चंद्रावरील माणसांशी बोलू लागलो आहोत पण आपल्या घरातला संवाद हरवत चालला आहे. सख्खे शेजारी एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागू लागलेले दिसतात. अशा प्रसंगी सत्य, अहिंसा तत्वांचे स्मरण करणे, जगाला नवी वाट दाखविणाऱ्या प्रेरणादायी महात्मा गांधीच्या चरित्राचे, विचारांचे मंथन हे नक्की नवीन उर्जा देणारे ठरेल. आपली माती, आपली माणसं, आपला विचार, आपले जगणं यांना कवेत घेणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांच्या सत्याच्या प्रयोगांचे स्मरण करणे ही आजची गरज आहे. त्याचे कारण महात्माजींनी प्रत्येक विचाराला आचरणाची जोड दिली. विचार आणि व्यवहार यात अंतर नसायला हवे, हे दाखविले. त्यामुळेच अल्बर्ट आईनस्टाईन नावाचा शास्त्रज्ञ म्हणाला होती की, "भावी पिढ्यांचा यावर विश्‍वास बसणे कठीण होईल की हाडामांसाचा असा एक माणूस या पृथ्वीतलावर होऊन गेला.' या महात्म्याला समजून घेत असताना त्यांनी मांडलेला एक विचार आपण सगळ्यांनी आजच्या चंगळवादाच्या जगात लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तो विचार असा की, "पृथ्वी प्रत्येकाच्या गरजा भागविण्याइतकी समर्थ आहे, पण ती प्रत्येकाची हाव भागवू शकत नाही.' गरज आणि हाव यातले अंतर माणसाला लक्षात यायला हवे. ते जर लक्षात आले नाही तर कितीही धावपळ केली तरी जगणे शांतीचे, सौख्याचे, समाधानाचे होत नाही. मला आणखी हवे, याला अंत नाही. माणसाचा हव्यास निसर्गाला ओरबडतोय आणि त्यातून उभा राहिलेली संकट आपण पहात अनुभवत आहोत. एक नदी नीट राहिलेली नाही. मी माझ्यापुरते बघणार या वृत्तीतून स्वच्छतेच्या अभावाचा किळवाणेपण सगळीकडे दिसते. स्वतःचा विनाश स्वतः करुन घेण्यासाठी सरसावलेल्या आजच्या जगात सत्यावर आधारित जगणे, अहिंसा आणि एकात्मता या मुल्यांची कधी नव्हे इतकी गरज निर्माण झाली आहे.
राजाराम ल. कानतोडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा