गुरुवार, ४ फेब्रुवारी, २०१६

चंपारण्य सत्याग्रह 1

महात्मा गांधीजींना देशातील शेतकऱ्यांच्या गळ्यातील ताईत बनविले ते चंपारण्यात नीळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी केलेल्या सत्याग्रहाने. त्याची सुरवात 1916 मध्ये झाली. कॉंग्रेसचे लखनौला अधिवेशन होते. तिथे सगळ्या नेत्यांना भेटायचा प्रयत्न एक शेतकरी करीत होता, पण त्याचे म्हणणे कुणी ऐकून घेत नव्हते. राजकुमार शुक्‍ला असे त्यांचे नाव. चंपारण्यातील नीळ उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायबाबत कॉंग्रेसने ठराव करावा, अशी त्यांची मागणी होती. त्यावेळी त्यांची साध्या काठेवाडी पोशाखातील गांधीजींशी भेट झाली. त्याने गांधीजींना निवेदन दिले. कॉंग्रेस अधिवेशनात ठराव करावा, अशी त्यांची मागणी होती. गांधीजींनी त्यांना सांगितले मी प्रत्यक्ष परिस्थीती पाहिल्याशिवाय ठराव करता येणार नाही. मी तिकडे आलो की मला भेट. गांधीजी तीन चार महिन्यांनी कलकत्त्याला बैठकीसाठी गेले. तिथे पुन्हा राजकुमार शुक्‍ला यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले नीळ उत्पादक शेतकऱ्यांना बळजबरीने इंग्रज व्यापारी नीळ पिकविण्यास भाग पाडतात. अत्यंत कमी किंमतीत ते नीळ खरेदी करतात. जगातील 80 टक्के नीळ त्यावेळी चंपारण्यात पिकविली जात होती. तिथे तीन कठियाचा कायदा होता. वीस कठांचा एकर. त्यातले तीन कठ नीळ लावणे शेतकऱ्यांसाठी बंधनकारक होते. शेतकऱ्यांनी हे ऐकले नाही. तर इंग्रज व्यापारी त्यांनी चापकाचे फटकारे मारत. अशी ही सगळी व्यथा ऐकल्यावर तातडीने सगळे हातातले कार्यक्रम त्यांनी बाजूला सारले आणि या आंदोलनासाठी तिथून निघाले.
आजही शेतीत आणिबाणीची स्थीती आहे. कारण सध्या रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या आपण वाचतो. एकीकडे भयाण दुष्काळ, दुसरीकडे पिकणाऱ्या शेतमालाला पुरेसा भाव नाही. शेतीकडे सरकारचे दुर्लक्ष, रोजगाराचा अभाव अशा चक्रात शेती उद्योग अडकला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात शेतमालाचे उत्पादन वाढत असताना, अन्नसुरक्षेच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होत असताना शेतीचा जीडीपीतला टक्का मात्र सातत्याने घसतो आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा शेतीचा राष्ट्रीय सकल उत्पन्नातला हिस्सा 60 टक्‍क्‍याच्या आसपास होता. त्यावेळी शेतीवर अवलंबून असणारे लोकसंख्या सुमारे 75-80 टक्के इतकी होती. आता ही शेतीवरची लोकसंख्या 60-65 टक्‍क्‍यांकडे कडे आली असली तरी शेतीचा सकल उत्पन्नातला हिस्सा अगदी 16 टक्के इतका आला आहे. याचा अर्थ अशा की शेतमालाला सरकार नीट भाव देत नाही. शेतकऱ्यांच्या हातात पुरेसा पैसा उत्पन्नातून यायला हवा तो येत नाही. त्यामुळे तो गळफास जवळ करत आहे.
अशा स्थितीत शेतकऱ्यांचे होणारे शोषण दूर करण्यासाठी गांधीविचारांच्या आंदोलनाची आज गरज आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा