शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१६

गुन्हा कबूल, शिक्षा द्या

चंपारण्यातला सत्याग्रह 2
एकाद्या विषयावर भूमिका घेताना महात्मा गांधी नेहमी त्या विषयाची सांगोपांग माहिती घेत असत. चंपारण्यात सत्याग्रहासाठी जायचे म्हटल्यावर निळीच्या कायद्याची माहिती असणारा वकिल आहे का म्हणून महात्मा गांधी यांनी राजकुमार शुक्‍लांना विचारले. त्यांनी राजेंद्र प्रसाद यांचे नाव सांगितले. राजकुमार आणि महात्माजी दोघे मिळून पाटण्याला आले. तिथे त्यांना राजेंद्रप्रसाद यांना भेटायचे होते. पण तिथे त्यांची राजेंद्रबाबूंशी भेट झाली नाही. मग गांधीजींना त्याच्याबरोर लंडनला बॅरिस्टरीचे शिक्षणासाठी असलेल्या मंजरुल हक यांची आठवण झाली. त्यांना गांधीजींनी चिठ्ठी पाठविली. ते घोडागाडी घेऊन गांधीजींनी नेण्यासाठी आले. त्यांना गांधीजींनी नीळ उत्पादकांवरील अन्यायाबाबत विचारले. चांगले वकिल कुठे मिळतील, याची माहिती घेतली. त्यांनी मुजफ्फुरनगरला जावे लागले असे सुचविले. त्यावेळी गांधीजींनी प्रा. जीवतराम कृपलानी यांची आठवण झाली. त्यांना गांधीजींनी चिठ्ठी पाठविली. ते रात्री विद्यार्थ्यांसह गांधीजींना नेण्यासाठी स्टेशनवर आले. त्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांना रेस्ट हाऊसमध्ये गांधीजींची सोय करावी म्हणून विनंती
केली पण ती त्या गोऱ्या अधिकाऱ्याने ते काही मान्य केले नाही. मग त्यांच्या एका मित्राकडे गांधीजींची राहण्याची सोय झाली.
तिथे काही वकिलांबरोबर गांधीजींची चर्चा झाली. आंदोलन करायचे म्हटल्यावर गांधीजींचा एक नियम होता, ज्यांच्याविरोधात आंदोलन करायचे, त्यांना भेटायचे त्यांचे मत ऐकून घ्यायचे असा गांधीजींचा दंडक होता. नीळ व्यापाऱ्यांच्या संघटनेच्या सचिवाला गांधीजी भेटले. त्यांनी सांगितले. तुम्ही या फंदात फडू नका. पोलिक कमिशन आणि कलेक्‍टरांनीही गांधीजींना स्थानिक नागरिक आपल्या समस्या सोडवतील, तुम्ही लक्ष घालू नका, असे सांगितले. पण मागे हटतील ते गांधीजी कसले?
आपल्या अनेक सहकाऱ्यांबरोबर गांधीजी हत्तीवर बसून चंपाऱ्यातील शेतकऱ्यांकडे निघाले असताना वाटेतच त्यांना सरकारी माणसाने पोलिस कमिशनरांनी बोलावल्याचे सांगितले. आपल्या सहकाऱ्यांना पुढे पाठवून गांधीजी पोलिस कमिशनरांना भेटायला गेले. त्यांनी सांगितले, तुम्ही तिकडे जाऊ नका. चंपारण्यात तुमच्यासाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गांधीजी म्हणाले, "या देशातील कुणा शेतकऱ्यावर जर अन्याय होत असेल तर मला त्यांना भेटायला त्यांच्या तक्रारी ऐकून घ्यायला गेलेच पाहिजे.'
दुसऱ्या दिवशी गांधीजींना न्यायालयात उभा करण्यात आले. शेतकरी आणि त्यांच्या साथीदारांच्या न्यायालयत भरुन गेले होते. तिथे प्रवेशबंदीचा सरकारी आदेश पाळला नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी न्यायालयाला गांधीजी म्हणाले, मी कायदा पाळणारा माणूस आहे, पण इथला प्रवेशबंदीचा आदेश मी पाळणार नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेणे मी माझे कर्तव्य समजतो. तुम्हा जी शिक्षा द्यायची ती मला द्या.
गुन्हा कबूल करणारा आणि लगेच शिक्षा मागणारा अजब माणूस न्यायालयाने कदाचित पहिल्यांदाच बधितला असावा. यांनी इतकी लगेच शिक्षा मागितली तरी न्यायालयाने सुनावणी दुसऱ्या दिवसावर ढकलली. गांधीजींनी दरम्यान रात्री गव्हर्नरला तार करुन कळविले. व्हाईसरॉयलाही याबाबत कळवावे, असे सांगितले. त्याचा चांगला परिमाण झाला. गांधीजींवरचा खटला मागे घेण्यात आला. तिथून बाहेर पडल्यावर गांधीजींनी पहिली गोष्ट अशी केली की वर्तमानपत्राच्या संपादकांना पत्र पाठवून प्रसिद्धीयोग्य बातम्या मी स्वतः तुमच्याकडे पाठविन. तुम्ही बातमीदारांना इकडे पाठविण्याचा त्रास घेऊ नका, असे कळविले. दुसरी गोष्ट म्हणजे या आंदोलनापासून स्थानिक राजकीय नेत्यांनी दूर ठेवले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा