स्वराज्य
बहुतेक प्रमुख पक्ष गांधीविचारांनी आपण चालत असल्याचे
सांगतात तरीही "स्व'कडे बघायला आणि त्यातल्या अपप्रवृत्ती दूर करायला कुणाला वेळ
नाही. त्यामुळे ते सामान्य माणसापासून तुटलेत. गांधीजींनी मांडलेला स्वराज्य या
शब्दाचा अर्थ आपण पुन्हा एकदा लक्षात घेण्याची गरज आहे.
राजाराम ल. कानतोडे
स्वतःचे नाव व्हावे, त्यातून संपत्ती कमवता यावी यासाठी सत्ता हस्तगत करणे आणि
सतत हातात रहावी, यासाठी झटणारे नेते आपण रोजच आजूबाजूला बघतो. गांधीजी यापेक्षा
वेगळे होते. राजकारणाचे अध्यात्मीकरण झाले पाहिजे, हा विचार मांडणारे नामदार
गोपाळकृष्ण गोखले हे त्यांचे राजकीय गुरू होते. त्यामुळे गांधीजी सांगतात की पदे
इतरांची पिळवणूक करण्यासाठी किंवा सत्ता गाजविण्यासाठी नसतात. सत्ता हे सेवा आणि
समाज बदलाचे साधन आहे. सत्तेचा हावरेपणा, आधुनिकीकरणातून येणारा भपकेबाजपणा,
वस्तुंची गुलामी या बाबीचा आढावा गांधींजीनी टीकात्म पद्धतीने घेतलेला आढळतो.
हिंसेची गुलामगिरी, वस्तुंचा हव्यास आणि उपभोगा यातून माणसाची सुटका व्हावी, हा
गांधीजींचा ध्यास होता.
हिंद स्वराज हा ग्रंथ गांधीजींनी 1909 मध्ये लिहिली.
त्यात त्यांनी इंग्रजांच्या वसाहतवादाविरूद्ध लिहिले आहे. हा वसाहतवाद मानवजातीस
हानिकारक आहे. त्याचे कारण वसाहतवादी क्रूर बनून ज्यांच्यावर राज्य करतात, त्यांना
हीनदीन बनवितात. कुणीतरी कुणावरती राज्य करणे या दोन्ही गोष्टी मानवजातीस हानीकारक
आहे, असे त्यांनी सांगितले. ज्यावेळी ब्रिटीश साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता,
तेव्हाची ही गोष्ट आहे.स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे लोकमान्य टिळकांनी
म्हटलेले आपल्याला माहिती आहे. पण गांधीजींनी स्वराज्याचा मांडलेला अर्थ तितकासा
परिचीत नाही. "स्व'च राज्य म्हणजे स्वराज्य नव्हे तर "स्व'वर राज्य म्हणजे
स्वराज्य. माझं माझ्यावर राज्य ही गांधीजींची स्वराज्याची संकल्पना होती. ही
संकल्पना जोपर्यंत रुजत नाही तोपर्यत स्वराज्य डळमळीत राहील. केवळ इंग्रजांना या
देशातून घालवून खरे स्वराज्य मिळणार नाही. आपल्या आत्म्याला आपण वाचविले पाहिजे,
असे अनेक विचार गांधीजींनी हिंद स्वराजमध्ये मांडले आहेत. नामदार गोपाळकृष्ण गोखले
यांना हे पुस्तक आवडले नव्हते. त्यांनी गांधीजींना पुस्तक रद्द करावे, असे सुचविले
पण गांधीजींनी भाषेत सुधारता करता येईल. मुलभूत विचार बदलता येणार नाहीत, असे
सांगितले होते. या पुस्तकाविषयी गांधीजींनी म्हटले आहे, की हे पुस्तक
द्वेशधर्माऐवजी प्रेमधर्म शिकविते. हिंसेच्या जागी आत्मबलिदानाची स्थापना करते.
पशुबळीच्याविरूद्ध टक्कर देण्यासाठी आत्मबळ उभ करते. टॉलस्टॉयने या पुस्तकाविषयी
म्हटले की जगासाठी जर काही
उपयोगी विचार असतील तर ते हिंद स्वराज पुस्तकात आहे.
विनोबा भावे यांनी या पुस्तकाची तुलना उपनिषधाशी केली आहे. सत्तेच्या
केंद्रीकरणातून निर्माण होणाऱ्या सैनाती वृत्तीविरुद्ध लढण्याचा मार्ग दाखविताना
गांधीजींनी राजकीय आणि आर्थिक विकेंद्रीकरणाचा मार्ग सांगितला आहे.
आजचा जमाना
अंधानुकरण आणि सत्तेच्या केंद्रीकरणाचा आहे. बहुतेक प्रमुख पक्ष गांधीविचारांनी आपण
चालत असल्याचे सांगतात तरीही "स्व'कडे बघायला आणि त्यातल्या अपप्रवृत्ती दूर करायला
कुणाला वेळ नाही. त्यामुळे ते सामान्य माणसापासून तुटलेत. गांधीजींनी मांडलेला
स्वराज्य या शब्दाचा अर्थ आपण पुन्हा एकदा लक्षात घेण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा